पुणे – ‘एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, कमिन्स इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’ पुण्यात २० ते २२ जानेवारी रोजी होणार आहे.
या स्पर्धेचे उदघाटन ऑर्कीड हॉटेल (बाणेर) येथे शनिवार दिनांक २० रोजी सायंकाळी ५ वाजता’फ्युएल ग्रुप’ चे केतन देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डा.के. सी.व्होरा (अध्यक्ष एस एई इंडिया वेस्टर्न) यांनी दिली. बालेवाडी येथे देशातील विद्यार्थी वाहनांच्या मॉडेल निर्मिती स्पर्धेत भविष्यातील वैज्ञानिक शोधांचे आविष्कार दाखविणार आहेत ! या ऑलिंपिक्समध्ये देशातून टीम सहभागी होणार आहेत.
दिनांक २१ जानेवारी रोजी स्पर्धा कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, बालेवाडी येथे सकाळी ९ ते ५ या कालावधीत होईल. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.सहभागी विद्यार्थी एक टीम म्हणून काम करणार आहे.स्किमर आणि फुग्यावर चालणारी जेट टॉय कार यासारखी वाहने बनविण्यासाठी शास्त्रीय रचना संकल्पना लागू करणे, फोर्स, गती, घर्षण, जेट प्रणोदन इत्यादीसारख्या भौतिकशास्त्राचे तत्त्वे शोधणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
डॉ अनिल सहस्त्रबुद्धे (ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन चे अध्यक्ष) यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत.
देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा अ वर्ल्ड इन मोशन उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धांमधून देशाचे भावी इंजिनियर्स घडणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राला दरवर्षी ६ लाख अभियंत्यांची गरज आहे. ती भागविण्यासाठी शालेय विद्यार्थामध्ये आतापासून गोडी निर्माण करण्यासाठी या ऑलिपिक्स स्पर्धा घेतल्या जातात
पुणे ऑलिंपिक्स मध्ये मदर तेरेसा हायस्कूल, खराडी हे विजेते झाले. ते नॅशनल ऑलिंपिक्स मध्ये सहभागी होतील, अशी माहिती डॉ.के.सी.व्होरा यांनी दिली.