पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय’ च्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. व्यवस्थापनातील धोरणे विषयावरील या परिषदेला अनेक तज्ञ सहभागी झाले होते. व्यवस्थापनातील अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि अस्पष्टता, आव्हाने आणि संधी या विषयी या परिषदेत चर्चा करण्यात आली. ही परिषद 4 सत्रांमध्ये पार पडली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.ए.इनामदार (अध्यक्ष, एम.सी.ई.सोसायटी) होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेसाठी भारत, युएई, इराण, येमन, नेपाळ अशा विविध देशांमधून 51 प्राध्यापक उपस्थित होते.
प्रा. डॉ. ध्रृवराज पोखरेल, (त्रिभूवन विद्यापीठ, काठमांडू, नेपाळ, व्यवस्थापन विभाग), प्रा.डॉ. क्रिस्टिना कुट्रा (‘बिझीनेस स्कूल’, न्यू यॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अबु धाबी, युएई), डॉ. एस. आर. माळी, डॉ. एम.डी.लावरेन्स, डॉ. मोहसिन शेख, डॉ. अनील केसकर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
‘देशाची लोकसंख्या एक असे संसाधन आहे, तिचा योग्यरित्या उपयोग केल्यास ती वरदान ठरते. परिस्थितीने उभारलेल्या आवाहनांना समर्थपणे तोंड देणार्या संघटनाच टिकाव धरु शकतात, ’ असे प्रतिपादन डॉ. पी.ए.इनामदार यांनी केले.
प्रा.डॉ. क्रिस्टिना कुट्रा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, ‘व्हि.यू.सी.ए. मुळे (अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि अस्पष्टता) प्रभावित झालेल्या घटकांना सामुदायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) द्वारा मदत देण्यावर भर दिला. तसेच प्रत्येक समस्येमध्येच समाधानाचे बीज असते’.
प्रा. डॉ. ध्रृवराज पोखरेल यांनी ‘नोटबंदी नंतर स्वयंम संतुलित अर्थशास्त्रीय प्रणाली’, डॉ. शैला बुटवाला यांनी ‘अनिश्चितता असलेल्या परिस्थितीमधील धोरणात्म बदल व आव्हाने’, डॉ. एस.आर माळी यांनी अस्थिर परिस्थितीमधील व्यूहरचनात्मक नेतृत्व’, डॉ. एम.डी.लॉरेन्स यांनी ‘भविष्यात येणार्या संकटाचा वेध कसा घ्यावा’ याविषयी आपले विचार मांडले.
डॉ. मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणातून ‘व्हिसीयुए ने मंदीच्या काळात संधी व आव्हाने दोन्हीही निर्माण केले. अशा वेळी एकात्म प्रणालीचा उपयोग करण्याची गरज आहे.’ यावर प्रकाश टाकला.
डॉ. अनील केसकर यांनी ‘व्हिसीयुए ला सामोरे जाण्यासाठी लागणार्या विविध धोरणांचे विवेचन केले.