पुणे:
– ईशालय स्कूल आॅफ कथक औंध तर्फे कथक विविधा कार्यक्रमाचे आयोजन
कथकमधील पारंपारिक नृत्यरचना आणि कथक नृत्यातील रचनांना आधुनिकतेची जोड देऊन सादर केलेल्या विविध नृत्यरचनांचा कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. वैविध्यपूर्ण नृत्यरचनांनी सजलेल्या कथक विविधा कार्यक्रमातून कथक नृत्यांगना ईशा काथवटे आणि त्यांच्या शिष्यांनी रसिकांवर विलोभनीय नृत्यरचनांची मोहिनी घातली.
ईशालय स्कूल आॅफ कथक औंधतर्फे नवी सांगवी येथील निळू फुले सभागृह येथे कथक विविधा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ईशा काथवटे आणि त्यांच्या ६० शिष्यांनी कथक नृत्यरचनांचे सादरीकरण केले. यावेळी आग्रा घराण्याच्या प्रख्यात गायिका डॉ. संध्या काथवटे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात अडाणा रागातील पारंपारिक शीववंदनेने झाली. यानंतर रुद्र तालातील गतनिकास, गिनती, चक्री, पंचपल्ली, तोडे या रचनांच्या सादरीकरणातून ईशा काथवटे यांनी कथक नृत्याचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडले. यानंतर ईशा काथवटे यांच्या शिष्यांनी तुर्कस्तानच्या संगीतावर खंजिरीचा वापर करून सादर केलेल्या नृत्यप्रकाराला रसिकांनी दाद दिली. राधा कृष्णाच्या विविध लीलांवर आधारित नीर भरन कैसे जाऊ सजनी अब… या नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
बॉल, रिबीन, रिंग अशी विविध साधने वापरून सादर केलेल्या कथक सर्कस या आगळ्यावेगळ्या नृत्यरचनेच्या सादरीकरणाने शिष्यांनी रसिकांची मने जिंकली. पावसाचे वर्णन असलेल्या मल्हार रागातील गरज गरज आये कारे बदरा… या नृत्यप्रकाराने रसिकांची विशेष दाद मिळविली. भूताची गोष्ट, ध्रुवता-याची कहाणी अशा विविध कथांचे नृत्यसादरीकरण रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. म्हारो प्रणाम बाके बिहारीजी… या यमन कल्याण रागातील भजनाने ईशा काथवटे यांनी कार्यक्रमात अनोखा रंग भरला. कार्यक्रमाची सांगता ट्रिब्युट टू तानसेन या बंदिशीच्या नृत्य सादरीकरणाने झाली. माणिक दामले यांनी सूत्रसंचालन केले.