पुणे :
गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी… गेल्यावरती स्वर्गामधल्या शब्दांमधूनी राहिन मी… या कवितेच्या ओळींनी प्रत्येकालाच आठवण होते, ती कुसुमाग्रज म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांची. कवितांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांच्या लेखनशैलीचे विविध पैलू उलगडण्यासोबतच त्यांचे सुरेख शब्दचित्र कलातीर्थच्या कलाकारांनी साकारले. विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांचे व्यक्तिमत्त्व पुणेकरांसमोर उलगडावे, याकरीता सुरु केलेल्या अटल कट्टा या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करण्यात आले.
निनाद पुणे, निनाद नागरी सहकारी पतसंस्था आणि कलातीर्थ पुणे यांच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त सदाशिव पेठेत अटल कट्टयावर कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करीत त्यांचे शब्दचित्र रेखाटण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, कलातीर्थचे अमोल काळे, ओवी काळे, उर्मीला घोडके, शुभांगी भट, अनिमीष देव, ओजस रानडे, अनुश्री काळे, स्वामिनी कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, कुसुमाग्रजांचा जन्म हा सदाशिव पेठेतील आहे. त्यामुळे कविता वाचनासारख्या उपक्रमांतून आपण त्यांच्या जन्माच्या पाऊलखुणा जपत आहोत. कुसुमाग्रजांची कवितेवर अपार निष्ठा होती. स्वातंत्र्याप्रती जागृती करणा-या गीतांप्रमाणेच त्यांनी अनेक प्रेमगीतेही लिहिली, हे त्यांचे वेगळेपण होते. त्यांच्या कवितांतून आजच्या तरुणाईला प्रबोधनात्मक वळण नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उदय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वानंद कुलकर्णी, भूषण चांदवेलकर, शुभांगी चव्हाण, अश्विनी कुलकर्णी, अरुणा व्हावळ आणि अमोल काळे यांनी शब्द चित्र रेखाटले.