पुणे –
महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाचा लाभ कामगारांना घेता यावा यासाठी गोयल गंगा डेव्हलपर्सतर्फे मार्केटयार्ड येथील गंगा धाम टॉवर्स या प्रकल्पस्थळी नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी अनेक कामगारांची नोंदणी करण्यात आली. सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते कामगार नोंदणी कार्डचे वाटप करण्यात आले.
या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत शासनाने २५ लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले असून यासाठी कामगारांना काही कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा फायदा घेता येणार आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांना घेता येणार असल्याने आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे गोयल गंगा डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी यावेळी सांगितले. यामार्फतआर्थिक, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विषयक सुरक्षा दिली जाणार आहे.
राऊत म्हणाले की, कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी ठरविण्यात आली असून ती २५ रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी १ रुपया आणि ६० रुपये पाच वर्षांसाठी आहे.तसेच नोंदणीसाठी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करणे हि आवश्यक असणार आहे.
याशिवाय बावधन मधील गंगा लेजंड आणि उंड्री मधील गंगा ग्लिट्झ येथे ही या आठवड्यात संबंधित मोहिमेंतर्गत नोंदणी केल्या जाणार आहेत. अशी माहिती गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल यांनी दिली.