पुणे :
कीर्तन आणि कथक या दोन वेगवेगळ्या कलांच्या संगमाचा अनुभव घेत कथक नृत्यकलेचा उगम कीर्तनकलेच्या माध्यमातून कशाप्रकारे झाला. याचा प्रत्यक्ष अनुभव रसिकांनी कीर्तन-कथक कार्यक्रमातून घेतला. या दोन्ही कला रंगमंचावर एकत्रितपणे सादर करून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी रसिकांना अनोख्या कलाविष्काराची विलक्षण अनुभूती दिली.
सूत्रधार तर्फे पारंपरिक कलाविष्कार क्षेत्रातील दोन दिग्गजांचा प्रवास रसिकांसमोर उलगडण्याकरीता कीर्तन कथक या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी शारंगधर साठे, सुचेता भीडे-चापेकर, गिरीजा बापट, रवींद्र दुर्वे, प्रमोद जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा स्तवनाने झाली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी देवीची महती सांगितली. यानंतर जय दुर्गे… या दुर्गा स्तवनावर ज्येष्ठ नृत्यांगना मनिषा साठे यांनी कथक नृत्याच्या सादरीकरणातून देवीला वंदन केले. यानंतर महिषासूराचा नाश करण्यासाठी देवीने कशाप्रकारे महिशासूरमर्दिनीचा अवतार घेतला याची माहिती कीर्तनामधून सांगितली आणि यावर सादर केलेल्या नृत्यसादरीकरणाने प्रत्यक्ष दुर्गा अवतरल्याचा अनुभव रसिकांनी घेतला.
कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आणि पं. मनिषा साठे यांनी कथकच्या माध्यमातून संत कान्होपात्राची कथा रसिकांसमोर मांडली. कान्होपात्रेच्या आयुष्यातील संघर्ष, विठठलाच्या भक्तीत रममाण झालेली कान्होपात्रा, विठठलाला भेटण्याची कान्होपात्रेची ओढ अशी भावनिक कथा कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी रसिकांसमोर प्रत्यक्ष उलगडली. कीर्तनाला अतिशय समर्पक अशा कथक नृत्याच्या सादरीकरणाने कान्होपात्रेच्या मनातील भावनांचे चित्रण पं. मनिषा साठे यांनी रसिकांसमोर सादर केले.
पं. मनिषा साठे यांना चारुदत्त फडके (तबला), वल्लरी आपटे (पढंत), मृण्मयी फाटक (गायन), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम), सुनील अवचट (बासरी) यांनी साथसंगत केली. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना मनोज भांडवलकर (पखवाज), मिलिंद तायवडे (तबला), वज्रांग आफळे (टाळ), रेशीम खेडकर (आॅर्गन) साथसंगत केली.