– इतिहास प्रेमी मंडळ व हिंद तरुण मंडळ ट्रस्टतर्फे ७५ व्या स्मरणदिनानिमित्त सन्मानसोहळ्याचे आयोजन
पुणे – लष्कर भागातील कॅपिटल म्हणजेच आताच्या व्हिक्टरी सिनेमागृहात अनेक इंग्रज प्रेक्षक जमलेले…सिनेमागृहात चित्रपट पाहण्यात सारेच तल्लीन होते…अचानक धडाम् धूम् असा आवाज झाला आणि प्रचंड बॉम्बस्फोटाचे सर्व परिसर हादरुन गेला. ब्रिटीश सरकारसह इंग्लंडचे पार्लमेंट देखील या घटनेने खडबडून जागे झाले होते. पुण्यातील क्रांतीकारकांनी ब्रिटीशांविरुद्ध केलेल्या या धमाक्याची आठवण रंगावलीतून जागृत करीत क्रांतीकारकांच्या वारसदारांचा सन्मान या घटनेच्या ७५ व्या स्मरणदिनानिमित्त करण्यात आला.
इतिहास प्रेमी मंडळ व हिंद तरुण मंडळ ट्रस्टतर्फे कॅम्पमधील व्हिक्टरी चित्रपटगृहाच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय कला अकादमीच्या ६० कलाकारांनी ३० बाय ४० फूट आकारातील रंगावली काढली. यावेळी कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन.यादव, अतुल गायकवाड, रा.स्व.संघाचे अॅड.प्रशांत यादव, नगरसेवक दिलीप गिरमकर, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष निलेश यादव, व्हिक्टरी थिएटरचे मालक चिनॉय आदी उपस्थित होते. कार्यक्रमात क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी घोषपथकातून मानवंदना दिली.
मोहन शेटे म्हणाले, छोडो भारत चळवळीच्या काळात करेंगे या मरेंगे या मंत्राने वातावरण भारलेले होते. अशावेळी पुण्यात बाबुराव चव्हाण, बापू साळवी, एस.टी.कुलकर्णी या भूमीगत कार्यकर्त्यांनी एकत्र येत, इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हिसका दाखविण्यासाठी जोरदार धमाका करण्याचा निश्चय केला. खडकीच्या अॅम्युनेशन फॅक्टरीतून भास्कर कर्णिक या तरुणाने बॉम्ब बाहेर आणण्याचे काम केले. त्या बॉम्बचे रुपांतर टाईम बॉम्बमध्ये करताना बापू डोंगरे आणी निळूभाऊ लिमये हे जखमी झाले. यावेळी मदतीला धावून आले ते रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये आणि सोळा वर्षाचे दत्ता जोशी. त्यांनी कॅपिटलच्या मालकाला गॉड सेव्ह द किंग हे पारतंत्र्याचे गीत न लावता वंदे मातरम् लावा नाहीतर परिणाम वाईट होतील, असा इशारा दिला होता.
ते पुढे म्हणाले, त्यानंतर या क्रांतीवीरांनी देशभरातील इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हादरवून टाकणारा बॉम्बस्फोट २४ जानेवारी १९४३ ला येथे घडवून आणला. त्यामध्ये ४ इंग्रज ठार झाले, तर १८ जण जखमी झाले. त्यामुळे खवळलेल्या इंग्रजांनी धरपकड सुरु केली. त्यानंतर विविध कारणांनी भास्कर कर्णिक, दत्ता जोशी हे कारागृहातच मरण पावले. त्यामुळे या स्फोटाचा खटला देशभर गाजला. त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्याचे स्मरण करण्याकरीता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणेकरांच्या दृष्टीने हे केवळ चित्रपटगृह नसून राष्ट्रीय स्मारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
क्रांतीकारक बापू डोंगरे यांचे पुतणे डॉ.सुधीर डोंगरे म्हणाले, बापूंना मी लहान असताना तुरुंगात भेटायला गेलो होतो. या घटनेनंतर जेव्हा ते तुरुंगातून सुटून घरी आले, तेव्हा आमचे घर हार-फुलांनी भरुन गेले होते. पुणेकरांनी त्यांचे स्वागत मोठया उत्साहात केले. बापू शेवटपर्यंत क्रांतीकारकच राहिले. इंग्लंडला हादरविणा-या स्फोटात आमचे पूर्वज होते, याचा आम्हा कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे, असे सांगत त्यांनी आठवणी जागविल्या. हरिभाऊ लिमये, निळूभाऊ लिमये, बापू साळवी, भालचंद्र वायाळ, बाबुराव चव्हाण, दत्ता जोशी यांसह अनेक क्रांतीकारकांचे वारसदार कार्यक्रमाला उपस्थित होते. रंगावली प्रदर्शन दि. २५, २६ जानेवारी रोजी दिवसभर पुणेकरांना पाहण्याकरीता खुले राहणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.