पुणे –
कॉंग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी महिला आणि युवती आता पुढाकार घेतील. त्या अनुषंगाणे लवकरच पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसची व युवती कॉंग्रेसची शहर पातळीवरील संघटना बांधणी करण्यात येईल. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 6 एप्रिल) संत तुकारामनगर, पिंपरी येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात महिला कॉंग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य संग्राम तावडे, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, शहर महिला उपाध्यक्षा संगिता कळसकर, भोसरी ब्लॉक अध्यक्षा उषा खवळे, चिटणीस हुरबानो शेख, विनीता तिवारी, नंदा तुळसे, तृप्ती शिंदे आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना गिरीजा कुदळे म्हणाल्या की, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशातील महिलांना शिक्षण, संपत्तीचे हक्क दिले. त्यामुळे आधुनिक भारताच्या प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या सोनिया गांधी आणि सलग दहा वर्षे युपीए सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधानपद भुषविणारे डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे देशाच्या जीडीपीत उल्लेखनिय वाढ झाली. आज दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, संगणक, दळवळणाच्या पायाभूत सुविधा, एफडीए या क्षेत्रात जे कोट्यावधी रोजगार उपलब्ध झाले आहेत. ते कॉंग्रेसच्या सर्वसमावेशक विचारसरणी मुळे झाले आहे. हा इतिहास आजच्या तरुण पिढीला सांगण्याचे काम महिला व युवती कॉंग्रेस करेल असा विश्वास गिरीजा कुदळे यांनी यावेळी व्यक्त केला.