पुणे
सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत यादव : अखिल भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे कर्तबगार महिलांचा सन्मान
हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपले बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्यानंतर हे स्वातंत्र्य अबाधित ठेऊन देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेणे ही तरुणांची जबाबदारी आहे. देशात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तरुणांनी क्रांतिकारकांच्या चरित्रातून प्रेरणा घेत देशहितासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी बलिदान स्मरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे,कृष्णकांत सातव, अॅड. किरण झिंझुरके, डॉ. विनोद सातव, गिरीश धडफळे,राजू दिक्षीत, विद्यावत्सल अन्नाप्रगडा, पुणे जिल्हा अध्यक्ष सुशील गायकवाड, सुमित भोळे, विशाल ढाकणे, विपुल सोनवणे, शाम भांगे, ऋषिकेश जगताप, अभिषेक घाटगे, स्वप्नील काळे उपस्थित होते.
हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी सांगवी, वाघोली, भोसरी, न-हे आंबेगाव, आकुर्डी आदी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थीसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. लघुउद्योजिका आनंदी पाटील, तैलबैला सुळका सर करणारी ७ वर्षाची शर्वी लोळगे, आंतरराष्ट्रीय धर्नुविद्यापटू भाग्यश्री कोलते, आदर्श शिक्षिका गायत्री गायकवाड, मल्लखांबपटू डॉ.ज्योत्स्ना चित्रोडा यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते.
वसुंधरा उबाळे म्हणाल्या तरुणांनी चांगल्या विचारांनी संघटीत व्हायला हवे. चांगल्या विचारांनीच देश घडणार आहे. केवळ देश स्वतंत्र होऊन उपयोग नाही. देशातील प्रत्येक नागरीक आचार आणि विचारांनी स्वतंत्र व्हायला हवा. हुुतात्म्यांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे बलिदान तरुणांंनी कायम लक्षात ठेवायला हवे. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन समाजासाठी काम करायला हवे. असे मत माजी जिल्हापरिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी व्यक्त केले. वैभव मोहड यांनी सूत्रसंचालन केले. सुशील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नील काळे यांनी आभार मानले.