एस.बी.पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मध्ये ‘भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि सत्यता’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे – जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की यश नक्कीच मिळते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या क्षेत्रात काम करीत असताना नवीन आव्हानांना सामोरे जा. यातूनच आपण प्रगती करू शकतो. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, कौशल्य विकास या योजना चांगल्या आहेत. सेवा आणि निर्मिती क्षेत्रासाठी त्या फायद्याच्या आहेत. नोटबंदी किंवा जीएसटी या निर्णयांचा औद्योगिक क्षेत्रावर कोणत्याही प्रकारे नकारात्मक परिणाम झाला नाही. हे निर्णय विकासासाठी फायद्याचेच आहेत, असे मत ऑरबिटल ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या व्यवस्थापकीय संचालिका मंजिरी बिचे यांनी शुक्रवारी आकुर्डी येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि सत्यता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बिचे बोलत होत्या. यावेळी सिल्व्हर ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे संचालक निरज शहा पीसीईटी ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रा. डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना बिचे म्हणाल्या की, सरकारने नोटबंदी, जीएसटी कर प्रणाली अंमलात आणली. हे निर्णय चुकीचे असून भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे बोलले जात होते. परंतु, औद्योगिकीकरणाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास या निर्णयांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. बाजार पेठेला स्थैर्य मिळाले असून परदेशी गुंतवणुक वाढली आहे. जीएसटी कर प्रणाली औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती. पूर्वी अनेक कर होते. जीएसटीमुळे हे विविध कर रद्द होवून संपूर्ण देशात एकच कर प्रणाली आली, असे बिचे यांनी सांगितले.
भारतामधील औद्योगिक क्षेत्राचा अधिक वेगाने विकास होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या विकासासाठी आयटी तसेच औद्योगिक विभागाची प्रगती गरजेची आहे. असे निरज शहा यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जागतिक स्तरावर खूप महत्त्व असून अनेक प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होतात. मात्र, जागतिक मंदीच्या काळात अनेक कंपन्यांमधून कामगार कपात करण्यात आली. याउलट निर्मिती क्षेत्र ज्यामध्ये औद्योगिक कंपन्यांचा समावेश होतो. त्यांचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे भारतात सुमारे 18 लाख रोजगार निर्माण झाले, असे शहा यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर चीनची अर्थव्यवस्था आणि तेथील जोमाने सुरू असलेल्या औद्योगिक विकासाची चर्चा नेहमीच होते. यामध्ये चीन आघाडीवर असल्याचेही बोलले जाते. परंतु, चीन पेक्षा भारतामध्ये औद्योगिक वाढ होण्यासाठी पोषक वातावरण, अनेक संधी आहेत. तरुणांची संख्या अधिक असून, नव कल्पना, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाची माहिती यामध्ये भारतीय आघाडीवर आहेत. यापुढील काळात जागतिक पातळीवर भारताचा बोलबाला अधिक वाढेल. आपल्या समोर येणा-या अडचणीवर सोडविण्यासाठी नीट अभ्यास करून त्याचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान अधिक विकसित कसे होईल, त्याचा सर्वांना फायदा कसा मिळेल, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे शहा म्हणाले.
पीसीइटीचे विश्वस्त भाईजान काझी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, एस. बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मध्ये अनेक उद्योजक, कार्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अधिकारी घडविण्याचे कार्य केले आहे. संस्थेची यशाची चढती कमान अशीच वाढावी यासठी पीसीइटीच्या विश्वस्तांकडून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन काझी यांनी दिले.
यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुवाहाटी विद्यापीठातील प्रा. डॉ. जी. जी. बनिक म्हणाले की, केंद्र सरकारने केलेली नोटबंदी, त्यानंतर आलेली जीएसटी कर प्रणाली हे निर्णय चांगले की वाईट यावर दोन मतप्रवाह आहेत. जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला तर 160 देशांमध्ये जीएसटी प्रणाली वापरली जात आहे. भारताचा विचार केला तर जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किंमती कमी होत आहेत. सरकारला अधिक कर मिळवायचा आहे. त्यासाठी कराचे दर वाढविण्यापेक्षा कमी दराने अधिक लोकांकडून कर मिळवल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल, हे साधे गणित मांडलेले आहे. जीएसटीचा छोट्या व्यापा-यांना फटका बसेल असे सांगितले जाते. परंतु, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात जीएसटी कर प्रणाली सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.