शुद्धनादतर्फे छोटेखानी मैफलीचे आयोजन; तन्मय बिच्चु (तबला) श्रुती विश्वकर्मा (गायन) यांचे सादरीकरण
पुणे –
तबल्याच्या तालबद्ध वादनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध करीत आणि विविध तालांचे पैलू उलगडत तबलवादक तन्मय बिच्चु यांच्या वादनात रसिक तन्मय झाले. फारुखाबाद आणि लखनऊ घराण्यांच्या वादनशैलीचा आधार घेत त्यांनी पारंपारिक क्रमाने तीनतालातील पेशकार, कायदे, रेले आणि बंदिशी वाजवून मैफलीत अनोखे रंग भरले. यासोबतच श्रुती विश्वकर्मा यांच्या शास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफलीची अनुभूती रसिकांनी घेतली. बहारदार तबलावादन आणि सुश्राव्य शास्त्रीय गायनाने उजळलेली स्वरप्रभात रसिकांनी अनुभविली.
शुद्धनादतर्फे छोटेखानी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तन्मय बिच्चु यांचे तबलावादन आणि श्रुती विश्वकर्मा यांचे शास्त्रीय गायन झाले.
मैफलीची पहिल्या सत्रात तन्मय बिच्चु यांनी अभ्यासपूर्ण तबला एकलवादन सादर केले. प्रामुख्याने फारुखाबाद आणि लखनऊ घराण्यांच्या वादनशैलीचा आधार घेत तन्मय बिच्चु यांनी पारंपारिक क्रमाने तीनतालातील पेशकार, कायदे, रेले आणि बंदिशी वाजवून मैफलीत अनोखे रंग भरले. दाया आणि बाया यांचा सुंदर समतोल, स्पष्ट आणि दमदार निकास, नृत्य अंगास पोषक असलेल्या काही बंदिशी, फर्माईशी व उत्कृष्ट पढंत याद्वारे मैफलीची रंगत अधिक वाढविली. अमेय बिच्चु यांनी लहे-याची समर्पक आणि उत्स्फुर्त साथ केली.
मैफलीच्या दुस-या सत्राची सुरुवात श्रुती विश्वकर्मा यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग जौनपुरीने मैफलीला सुरुवात केली. राग जौनपुरीतील विलंबित तीनतालातील ए बिराजे अवधपती रामचंद्र… आणि अपनी कहत कौ की न मानत… या बंदिशींनी रसिकांची मने जिंकली. यानंतर हिंडोल रागातील विलंबित एकतालातील बाजन लागे ए मोरे आंगन मे… आणि द्रुत लयीतील मगवा रोक राहिला… या बंदिशींना रसिकांनी विशेष दाद दिली. सुधी ना लिन्ही… या दाद-याने मैफलीची सांगता झाली. लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम), प्रणव गुरव (तबला) यांनी साथसंगत केली. सायली जोशी यांनी सूत्रसंचालन केले.