-एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे पद्मभूषण राजीव सेठी यांना जीवन गौरव पुरस्कार
पुणे – “संगीत, हस्तकला, वास्तुशिल्प, वस्त्रप्रावरणे इ. त्याचप्रमाणे सर्व राज्यातील कलाप्रकारांना एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकारांची कला जगासमोर आणल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारच्या आर्थिक मदती बरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळत जाईल.” असे विचार एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक पद्मभूषण राजीव सेठी यांनी काढले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांना‘ जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा हे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं.अतुल कुमार उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे अंकुश सेठी, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ.चंद्रकांत पांडव, सल्लागार डॉ. जय गोरे, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ.एल.के. क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण आणि माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना पद्मविभूषण राजीव सेठी म्हणाले,“ भारताच्या प्रत्येक विभागात सृजनात्मक कला दिसते. या देशात विशेषकरून लोककला आणि हस्तशिल्प या सर्वेत्कृष्ठ कला दिसतात. मुंबई विमानतळावर प्रथमच कला क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला. त्यामुळे देशातील सर्व कलाप्रकारांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. तेथे 7 हजार कलाकृती पहावयास मिळतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अध्यात्म हा महत्वपूर्ण घटक आहे. तोच धागा पकडून आम्ही विज्ञान आणि अध्यात्माच्या आधारे शिक्षण देण्याचे कार्य करीत आहोत. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे 21वे शतक हे भारताचे शतक असेल. तसेच, भारत देश संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देईल.”
पं.अतुल कुमार उपाध्ये म्हणाले,“ संगीत ही सर्व जगाची भाषा आहे. संगीत ही कला देश व संपूर्ण मानवजात यांना जोडण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करते. मी व्हायोलिनवादक असल्यामुळे प्रत्येक वेळेस माझे व्हायोलिन सर्वांशी बोलत असते.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्थापनेबरोबरच विश्वशांतीसाठी केल्या जाणार्या कार्याची सविस्तर माहिती दिली. डॉ. चंद्रकांत पांडव यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.