MAH: नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

October 8th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अत्याधुनिक आणि सुसज्ज झाली असून या इमारतीतून लोकाभिमूख आणि गतीमान पध्दतीने काम व्हावे. त्याच बरोबर सामान्य लोकांच्याबद्दल संवेदनशीलता जपली जावून नवी कार्यसंस्कृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अनिल शिरोळे, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, राहुल कुल, मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, सार्वजनि‍क बांधकाम विभागीय मुख्य अभियंता प्रवीण किडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अतिशय सुसज्ज झाली आहे. सार्वजनि‍क बांधकाम विभागाने अत्यंत चांगल्या प्रकारे या इमातरतीचे काम केले आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या सर्व सरकारी इमारती या कार्पोरेट क्षेत्राच्या पध्दतीच्या बांधण्यात येत आहेत. नवीन इमारतीमध्ये जाणे हे प्रगतीचे लक्षण असते. पुणे जिल्ह्याची प्रगती चौफेर आहे. मात्र या कामाला आणखी गती मिळावी. पुणे‍ विभागीय आयुक्तांनी राबविलेला झिरो पेन्डन्सी उपक्रम स्तुत्य असून संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
सामान्य जनतेची कामे विहीत वेळेत आणि तत्परतेने व्हावीत, अशी अपेक्षा असते त्यासाठी शासनाने सेवा हमी कायदा केला आहे. त्यामुळे आपण सर्व जण सामान्य लोकांची कामे वेळेत करण्यात बांधिल आहोत. नवीन इमारती आणि चांगल्या वातावरणामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता वाढणार आहे. या ठिकाणी सामान्य लोकांसाठी चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे, मात्र या व्यवस्थेबरोबरच सामान्यांच्या प्रती आस्था निर्माण होणे आवश्यक आहे. आपण लोकांचे शासक नाही तर सेवक आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे.
पुण्यात नव्याने तयार होणाऱ्या विमानतळाच्या कामासाठी सिंगापूरच्या “चँगी” या सरकारी कंपनीची मदत घेतली जाणार आहे. त्याच बरोबर पीएमआरडीच्या नियोजनाच्या कामातही सिंगापूर सरकारची मदत घेवून दोन्हीही कामे अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अत्यंत चांगल्या प्रकारे बांधण्यात आली आहे. महसूल विभागातील तलाठी कार्यालयापासून सर्वच इमारती याच धर्तीवर यापुढे बांधण्यात येणार आहेत. चांगल्या वातावरणात काम केल्यावर तेथील कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेत वाढ होत असते. वीजेची बचत होण्यासाठी राज्यातील दीड हजार सरकारी इमारतीमधील जूने बल्ब, फॅन बदलून कमी वीजेचा वापर करणारी यंत्रणा बसविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या निर्मिती प्रक्रीयेतील सुरुवातीपासूनची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, मुख्य अभियंता प्रवीण किडे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. तर आभार अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी मानले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions