पुणे :
निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा पातळीवरील चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी निवडणूक शाखेचे तहसिलदार देवदत्त ठोंबरे, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत संस्थांचे स्वयंसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती मोनिका सिंह म्हणाल्या, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधितांच्या मदतीने दिव्यांग मतदारांचे प्रभाग, नोंदणी क्रमांकांची माहिती घेण्यात येत आहे. पोस्टर्स, बॅनर्स बरोबरच ब्रेल लिपीतून मतदानाच्या सुविधेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्यकतेनुसार मदतनीस तसेच या अनुषंगाने रॅम्प्स, व्हिलचेअर जाऊ शकतील असे प्रशस्त दरवाजे असणारी मतदान केंद्रे तळ मजल्यावर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्थांनी अधिकाधिक दिव्यांग मतदारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या मतदान केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात येत असून या सर्व व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्रीमती सिंह यांनी चर्चासत्रात दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींच्या मतदार नोंदणीबाबत तसेच दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत यावेळी माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना सोयी- सुविधा पुरविण्याबाबतचे नियोजन व अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेवेळी येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. आभार तहसिलदार देवदत्त ठोंबरे यांनी मानले.