पुणे :
भावभावनांतून प्रकटलेल्या लकबी… भाव, राग, ताल आणि नृत्याचा मिलाप… त्यातून सादर झालेला कलाविष्कार… आलारमेल वल्लींच्या बहारदार नृत्याने अन त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि पंडित प्रवीण गोडखिंडी यांच्यातील कंठ (स्वर) आणि वाद्य (सूर) यांच्या रंगलेल्या जुगलबंदीने रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते, भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित आणि कॉटनकिंग प्रस्तुत दोन दिवसीय नूपुरनाद महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, कॉटनकिंगचे कौशिक प्रदीप मराठे, भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नंदकुमार वढावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, पुणेकर रसिकांसाठी हा महोत्सव विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
कोथरूडमधील आयडियल कॉलनी मैदानावर भरलेल्या या महोत्सवात भरतनाट्यम नृत्यांगना पद्मभूषण विदुषी अलारमेल वल्ली यांचे सादरीकरण झाले. पृथ्वीवरील निसर्गाची विविधे रूपे त्यांनी नृत्याविष्कारातून सादर केली. ‘संगम’ या प्राचीन तामिळ काव्यावर आलारमेल वल्ली यांनी गोष्ट साकारत त्यातली खट्याळ पात्रे, बालपणीच्या मित्राबरोबरची भावना आपल्या हावभावातून सादर केली. देहभान हरपून सादर केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी दाद दिली. वर्णम नृत्यप्रकार, हंसगम रागातील नृत्यलहरीतुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. वसुधा रवी (गायन), सी. के. वासुदेवम (नटूवंगम), शक्तिवेध मुरुंगधम (मृदूंग), के. पी. नंदिनी (व्हायोलिन) यांनी अलारमेल वल्ली यांना साथ केली.
त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवुंडी व पंडित प्रवीण गोडखिंडी यांची गायन व बासरीची जुगलबंदीने रंगत आली. प्रथमच गायन आणि वादन यांतील जुगलबंदी पाहताना रसिकांना परमोच्च आनंदाची अनुभूती येत होती. मारू बिहाग राग खुलवत कानसेनांचा कस लावणाऱ्या हरकती घेत दोघांनी आपल्या सुरावटींची विलक्षण बरसात केली. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके, तानपुऱ्यावर रामेश्वर डांगे यांनी, तर हार्मोनियमवर राहुल गोळे यांनी साथ केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा महोत्सव आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार येथे येऊन आपली कला सादर करतील. कोथरुडकरांसह पुणेकरांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरेल. अशा सांस्कृतिक महोत्सवांना पाठबळ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”
शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असून, यातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडत आहे, असे डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले.