पुणे :
ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत आहे, त्याचप्रमाणे नवीन आजाराची देखील निर्मिती होेत आहे. इंटरनेटमुळे रुग्ण देखील आता ज्ञानी झाला आहे. आजार आणि त्यावरील उपचारांची माहिती आता रुग्णांना देखील होते. त्यामुळे दोघांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. याचाच विचार करुन रुग्णदरबार हा उपक्रम श्री हॉस्पिटलमध्ये राबविण्यात आला आहे. यामाध्यमातून समस्या नसतील तेव्हाच समस्यांचा विचार करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे श्री हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीहरी ढोरे पाटील यांनी सांगितले.
डॉक्टर्स आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या मनातील शंकांचे निरसन थेट डॉक्टरांद्वारे व्हावे, रुग्णांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन मिळावे यासाठी खराडी येथील श्री हॉस्पीटलतर्फे रुग्णांसाठी रुग्णदरबार हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या रुग्णदरबाराचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे निवृत्त मुख्य न्यायाधीश सुमंत कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.रमेश भोसले उपस्थित होते.
डॉ. श्रीहरी ढोरे पाटील म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णाचे नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही. पूर्वी दोघांमध्ये सलोख्याचे संबंध होते. परंतु आता तसे नाते राहिले नाही. वैद्यकीय व्यवसाय हे नोबेल प्रोफेशन मानले जाते, परंतु आता परिस्थिती बदलत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन प्रत्यक्ष डॉक्टरांद्वारे व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
सुमंत कोल्हे म्हणाले, वैद्यकीय व्यवसाय म्हणजे समाजसेवेचे व्रत आहे. त्यामुळे रुग्णदरबार हा अतिशय आगळावेगळा उपक्रम आहे. रुग्णांच्या आरोग्याच्या पलिकडे जाऊन संवाद येथे साधण्यात येईल. रुग्ण आणि डॉक्टरांसाठी रुग्णदरबार हे एक व्यासपीठ आहे.
डॉ. रमेश भोसले म्हणाले, कोणत्याही रुग्णाला बरे करण्यात केवळ डॉक्टरच नाही तर रुग्णाचे नातेवाईक आणि स्वत: रुग्ण हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. नवीन तंत्रज्ञानाने क्लिष्टता अधिक वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तंत्रज्ञानाच्या वापराचे फायदे आणि तोटे अधिक चांगल्या पद्धतीने सांगायला हवी. कोणताही आजार झाल्यानंतर उपचार डॉक्टर करतात. परंतु पुढील आजार उद्भवू नयेत यासाठी देखील डॉक्टरांनी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी हा उपक्रम डॉक्टर, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.