पुणे :
पं. सुधाकर चव्हाण (गायन), पं. रामदास पळसुले (तबलावादन) यांचे सादरीकरण;श्रुती गंधर्व संगीत प्रसारक संस्थेतर्फे श्रुती गंधर्व संगीत महोत्सव २०१८ चे आयोजन
तबल्याच्या ठेक्यावर रसिकांना एकाग्र करीत आपल्या बहारदार तबलावादनाचा अनोखा नजराणा पं. रामदास पळसुले यांनी रसिकांसमोर ठेवला. तसेच आपल्या तडफदार गायकीद्वारे पं. सुधाकर चव्हाण यांनी शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि भजनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. बहारदार तबलावादन आणि सुमधूर गायकीने सजलेल्या संगीत मैफलीची अनुभूती रसिकांनी घेतली.
श्रुती गंधर्व संगीत प्रसारक संस्थेतर्फे हडपसर येथील बंटर हायस्कूल येथे श्रुती गंधर्व संगीत महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुस-या दिवशी पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन आणि पं. रामदास पळसुले यांचे तबलावादन झाले. यावेळी स्वप्नील शहा, विशाल कामठे, मित्रावरुण झांबरे, सुनील दाभाडे, सुरेखा सुर्यवंशी उपस्थित होते.
मैफलीची सुरुवात गायक पं. सुधाकर चव्हाण यांनी राग यमनने केली. काहे सखी… या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. श्याम बजाये आज मुरलीया… या बंदिशीने रसिकांची मने जिंकली. अवघा रंग एक झाला… या भजनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
मैफलीच्या दुस-या सत्राची सुरुवात पं. रामदास पळसुले यांच्या तबलावादनाने झाली. त्यांनी तीन तालातील विलंबित लयीत सादर केलेल्या पेशकार, कायदे, लये आणि मध्य लयीत सादर केलेल्या लये, गत, तुकडे यांच्या वादनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तबल्याचे आणि डग्ग्याच्या स्वतंत्र वादनातून निर्माण झालेल्या नादामुळे रसिकांनी तबलावादनाचा अप्रतिम कलाविष्कार अनुभवला. फारुखाबाद घराण्यातील बंदिशींच्या तबलावादनाद्वारे पं. रामदास पळसुले यांनी तबलावादनाचे बारकावे रसिकांसमोर उलगडले.
पं. सुधाकर चव्हाण यांना प्रदिप सुतार (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनियम), संदिप गुरव व नवनाथ फडतरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. पं. रामदास पळसुले यांना देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), गणेश तानवडे (तबला) यांनी साथसंगत केली. प्रा. विकास वाघ यांनी सूत्रसंचालन केले.