पुणे:
शहरातील नागकिांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हेसोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपाच्या या पारदर्शक भ्रष्टाचाराचा जनतेवर अधिभार का? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (1 मार्च) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपाने केलेल्या पाणीपट्टी दरवाढ विरोधात निदर्शने केली. या वेळी महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्प संख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, मॅन्यूअल डिसुजा, क्षितिज गायकवाड, विश्वनाथ खंडाळे, सचिन नेटके, तानाजी काटे, गौरव चौधरी, तारीख रिझवी, विजय ओव्हाळ, सुरेश लिंगायत, सिद्धार्थ वानखेडे, फय्याज शेख, हुरबाणो शेख, कल्पना जाधव, वामण ऐनेले, अर्जून खंडागळे, विठ्ठल खलसे, भास्कर नारखेडे, अनिरूद्ध कांबळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले, मागील वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मस्ती आलेली आहे. ही मस्ती कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादली. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करून सहा हजार लिटर मासिक पाणीपुरवठा प्रत्येक कुटुंबाला मोफत देणारी देशातील पहिली महापालिका असे जाहिर करून प्रसिद्धी करून घेतली.
प्रत्यक्षात मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वात कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. प्रस्तावित दरवाढीमुळे देशात सर्वात महागडा पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड मनपा नागरिकांवर लादत आहे. 5 हजार 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. 405 कोटीच्या निविदा प्रक्रियेत 35 कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली हि रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून 70 कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ नागरिकांवर लादली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करील असा इशारा सचिन साठे यांनी दिला.