पुणे –
विकासाचे गाजर दाखवित शेकडो आश्वासने देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेवर येऊन एक वर्ष उलटून गेले. जनतेची दिशाभूल करणा-या भाजपने अद्याप एकही आश्वासन पुर्ण केले नाही. महागाईने त्रस्त झालेली जनताच पुढील काळात भाजपाच्या पुढा-यांच्या तोंडावर गाजर मारेल. असा विश्वास पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘बैलगाडीतून भाजपाच्या अच्छे दिनची गाजर यात्रा’ काढण्यात आली. शनिवारी (दि. 7 एप्रिल 2018) नवी सांगवीतील साई चौक येथून सुरु झालेल्या यात्रेचा समारोप पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्क येथे करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शाम जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश संघटक विशाल काळभोर, लाला चिंचवडे, प्रतिक सांळुखे, सुरेश कोकाटे, तानाजी (पिंटू) जवळकर, गौरव टण्णू, सईश कोकाटे, निलेश निकाळजे, अमोल पाटील, शेखर काटे, कुणाल थोपटे, मयुर जाधव, चैतन्य चोरडिया, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, सनी डहाळे, मंगेश बजबळकर, आलोक गायकवाड, पंकज चोपदार, शुभम काळे, कुणाल रावडे, सुरज उंबरकर, विरेंद्र हेगडे, कुणाल वाघमारे, हर्षद म्हेत्रे, शेखर स्वामी, ऐश्वर्या देशपांडे आदींसह शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
वाकडकर म्हणाले की, देशभर महागाईने उच्चांक गाठला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 80 डॉलरने कमी झालेले असतानाही देशात पेट्रोल प्रति लिटर 80 रुपयांहून जास्त दराने विकले जाते. यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भाववाढीमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक भाववाढ झाली आहे. तरी देखील केंद्र व राज्य सरकार फसवी आकडेवारी जाहिरातीतून देत आहे. पिंपरी चिंचवड मधील सर्व समस्या सोडवू असे आश्वासन भाजपाने दिले होते. अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न, रेड झोनचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न हे सर्व प्रश्न जैसे थे आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादीने मागील काळात सिसिटिव्ही कॅमेरे उभारले होते. त्याची साधी देखभाल यांना करता येत नाही. नागरीकांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादीने उभारलेली रुग्णालये यांना अद्याप सुरु करता आली नाहीत. टक्केवारीच्या राजकारणातच भाजपाच्या पुढा-यांनी एक वर्ष संपवले. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेली जनताच पुढील काळात त्यांच्या तोंडावर गाजर मारेल, असे वाकडकर म्हणाले. यावेळी सरकारचा निषेध म्हणून बैलगाडीमध्ये दुचाकी, रिकामे उलटे हांडे, कचरा ठेवून यात्रा काढण्यात आली.