पुणे – राज्यातील भार नियमनाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने रास्ता पेठयेथील महा वितरण कार्यालयासमोर ‘मोबाईल टॉर्च ‘लावून निदर्शने केली . पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली .
यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे ,नगरसेवक सुभाष जगताप ,माजी आमदार कमल ढोले -पाटील ,रवींद्र माळवदकर ,नगरसेविका नंदा लोणकर ,गफूर शेख , अनीस सुंडके ,महिला आघाडी अध्यक्ष रूपाली चाकणकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राकेश कामठे , राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष मनाली भिलारे ,शहर उपाध्यक्ष अशोक राठी ,मिलिंद वालवाडकर ,निलेश नवलखा आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना ,विद्यार्थ्यांना ,शेतकऱ्यांना ,रुग्णालयांना भार नियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला . महा वितरण चे मुख्य अभियंता एम जी शिंदे ,अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना यावेळी निवेदन देण्यात आले . भार नियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली .
‘विकास बरोबर प्रकाश गायब भारनियमन करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भोंगळ कारभाराचा धिक्कार असो असे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते . कोळशाची टोपली देखील आंदोलकांनी बरोबर आणली होती
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,’ पुण्यासह राज्यातील वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तर 10-12 तास नागरिकांना लोड शेडींगला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातही आता दररोज तास न तास लोड शेडींग होत आहे. त्याची पूर्व कल्पना नागरिकांना मिळत नसल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना अडचणी भेडसवत आहेत.
खंडित वीज पुरवठ्याबाबत चौकशी केल्यावर, चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी कोळसा अपुरा पडत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे समजले. त्यामुळेच राज्यभर लोड शेडींग होत आहे. मुळात राज्यात दररोज किती वीज पुरवठा करावा लागतो, दसरा- दिवाळी या सणांच्या कालावधीत वीज पुरवठ्याची मागणी वाढते, हे लक्षात घेऊन या पूर्वीच कोळसा पुरेसा साठवून का ठेवता आला नाही ? या बाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि तसेच या महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष करणारया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात येत आहे.