पुणे :
राज्यातील मंदिरांच्या विश्वस्त, प्रमुखांचे पुण्यात एकत्रिकरण व चर्चासत्र
विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समितीच्यावतीने आयोजन
आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथे मठमंदिरांकरीता स्वतंत्र मंत्रालय आहे. अनेक मंत्री व प्रशासकीय अधिकारी हे याद्वारे धर्माची आणि मंदिरांची काळजी घेत आहेत. राष्ट्र हाच धर्म आणि धर्म हेच राष्ट्र ही भावना तेथील प्रत्येकामध्ये आहे. महाराष्ट्रात राष्ट्र, धर्म व संस्कृतीच्या रक्षणाकरीता मठमंदिरांबाबत अशा प्रकारचे पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. अनेक मंदिरांमध्ये भजन व भोजन असा दोन कलमीच कार्यक्रम पहायला मिळतो. याव्यतिरिक्त गुरुकुलपद्धती, वेदपाठशाळा यांसारखे उपक्रम देखील व्हायला हवे. धर्मरक्षणाकरीता शासनाचा सहभाग वाढावा, यासाठी महाराष्ट्रात मठमंदिरांकरीता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंडित वसंतराव गाडगीळ यांनी केले.
विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समितीच्यावतीने राज्यातील मंदिराच्या विश्वस्त, प्रमुखांचे एकत्रिकरण आणि चर्चासत्राचे एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री चंपतराय, उपाध्यक्ष बाळासाहेब नाईक, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ.गो.ब.देगलूरकर, एकनाथ शेटे, बाबूजी नाटेकर, विजय देशपांडे, भाऊराव कुदळे, विजय देशपांडे, नंदकुमार देवधर, महेंद्र देवी, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, अॅड. मुकुंद आगलावे, आयोजक व समितीचे संपर्क प्रमुख मनोहर ओक, सहसंपर्क प्रमुख भगवंतराव कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात धर्मरक्षक पुरस्कार बारामतीचे अॅड. सुधीर पाटसकर यांना प्रदान करण्यात आला.
डॉ.गो.ब.देगलूरकर म्हणाले, अनेक ठिकाणी मंदिरांबाबत अनास्था पहायला मिळते. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न वाटायला हवे. त्याकरीता पुजा-यांना शास्त्राची माहिती असणे, मंदिरात स्वच्छता असणे आवश्यक आहे. देऊळ ही सामाजिक संस्था असून ती टिकविणे म्हणजे आपली संस्कृती टिकविणे आहे. प्रत्येक मंदिरामध्ये धर्माचे ज्ञान दिल्यास धर्मांतरासारख्या घटना घडणार नाहीत.
अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, रुढी परंपरा यांचा विचार करुन त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी विश्वस्तांची नेमणूक व्हायला हवी. भारतीय संविधान व विश्वस्त नियम कायदा यांची सांगड घालून धार्मिक संस्थांचे कायदेविषयक प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मंदिराला मिळणारा निधी हा समाज उभारणीकरीता उपयोगात आणायला हवा. तसेच धार्मिक संस्थांना आयकरातून सवलत मिळणे आवश्यक आहे. संजय मुदराळे यांनी सूत्रसंचालन केले.
* सरकारने हिंदू मंदिरांमध्ये हस्तक्षेप करु नये : वि.हिं.प. चे अखिल भारतीय महामंत्री चंपतराय
मंदिराची व्यवस्था चांगली हवी, याकरीता सरकारने देखभालीची भूमिका मंदिरांबाबत घ्यायला हरकत नाही. मात्र, हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन सरकारने आपल्या हातात घेणे चुकीचे आहे. मंदिर ज्या परिसरात आहे, तेथील स्थानिक लोकांना याची जबाबदारी द्यायला हवी. मंदिरात मिळणा-या निधीची उपयोग पाठशाळा, व्यायामशाळा, आरोग्य, गोशाळा आदींकरीता व्हायला हवा. मोठया मंदिरांनी आपल्या आसपासच्या गरजूंना मदतीचा हात देण्याकरीता देखील पुढे यायला हवे. तसेच सर्व मंदिराच्या विश्वस्तांनी नियमीतपणे एकत्र येत, आपल्या प्रश्नांवर चर्चा करावी, असे वि.हिं.प. चे अखिल भारतीय महामंत्री चंपतराय यांनी सांगितले.