पुणे – क्रेडाई महाराष्ट्र आणि ‘महारेरा’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अल्पावधीतच ‘महारेरा’मध्ये १५ हजाराहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत होऊ शकले. हा कायदा लागू होण्यापुर्वी व नंतर क्रेडाई महाराष्ट्रने विविध माध्यमातून ‘महारेरा’विषयी जागरूकता निर्माण केली, असे सांगत ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी ‘महारेरा’ नोंदणीचे संपूर्ण श्रेय क्रेडाई महाराष्ट्राला दिले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या ‘नेतृत्व विकास’ या विषयावर आधारित भरविण्यात आलेल्या शिखर परिषदेचे आज नगरविकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे संस्थापक व माजी अध्यक्ष रामकुमार राठी यांच्यासह राज्याच्या ५०हून अधिक शहरातून क्रेडाईचे पदाधिकारी व २००हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.
चॅटर्जी म्हणाले की, काही नोंदणीकृत प्रकल्पाच्या बाबतीत नियमांची पूर्तता होताना दिसत नाही. अशा व्यावसायिकांना महारेरामार्फत ई मेलद्वारे कळविले जात असले तरी क्रेडाईने देखील आपल्या माध्यमातून त्यांना जागरुक करावे, यासाठी संबंधित प्रकल्पाची आवश्यक ती माहिती पुरविण्याचे सहकार्य महारेराकडून केले जाईल.
ते पुढे म्हणाले की, काही अपप्रवृतींमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहक आणि विकसक यांच्यातील परस्पर विश्वास उरला नाही. तो ज्यावेळी निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने बांधकाम क्षेत्राचा विकास होईल. या प्रक्रियेत विकसकांप्रमाणेच महारेराचीही भूमिका महत्वाची ठरेल.
यावेळी शेंडे म्हणाले की, संपूर्ण राज्यात प्रमाणबद्ध प्रक्रिया निर्माण करण्याचे काम नगरविकास विभागामार्फत चालू आहे. याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून विकासकांना व पर्यायाने त्याचा फायदा नागरिकांना व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्याने होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी पुढील १० ते २० वर्षांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे काम आम्ही प्रगतीपथावर करत आहोत. परंतु, या सर्व कार्यात आम्हाला क्रेडाईच्या सक्रीय सहभागाची अपेक्षा आहे. यातून विचारांचे आदानप्रदान होईल, समस्याचे निराकरण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महिन्यातून अथवा तीन महिन्यातून एकदा नगरविकास विभागाशी चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्याची सूचनाही शेंडे यांनी यावेळी क्रेडाई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना केली.
यावेळी कटारिया म्हणाले की, गौतम चॅटर्जी यांच्या दुरदृष्टीकोनामुळेच महारेरा कायदा प्रभावीपणे प्रत्यक्षात येऊ शकला. शेंडे आणि चॅटर्जी यांच्यासारखे कृतिशील अधिकारी असल्याने बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे. यावेळी सतीश मगर, रामकुमार राठी, राजीव पारीख यांनी मनोगत व्यक्त केले. केवळ ५ शहरांना घेऊन आम्ही सुरू केलेल्या क्रेडाई महाराष्ट्र संघटनेचा आज ५० शहराहून ठिकाणी झालेला विस्तार पाहून अभिमान वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.