पुणे
मुख्यमंत्री कार्यालयाच्या चहापाण्याच्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी उपस्थित केलेली शंका संसदीय भाषेत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले प्रत्युत्तर अपरिपक्वपणाचे आहे.
राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही, असे म्हणणे तर फाजील आत्मविश्वासाचे लक्षण आहे, असा बालीशपणा मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीकडून अपेक्षित नाही, अशी टीका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार, अॅड. वंदना चव्हाण यांनी केली आहे.
शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही टीका केली आहे.
‘भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिना’ची सभा अत्यंत खालच्या पातळीवरील भाषणांची झाली. त्यात राष्ट्रीय अध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी पातळी सोडली. संस्कारांचे वारंवार नामस्मरण करणार्या पक्षाचे प्रत्यक्षातील वर्तन दिसून आले आहे. विरोधकांना कोल्हे, लांडगे म्हणणे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते?’ असा प्रश्न अॅड. खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीच्या भल्यासाठी कोणच्याही नादाला लागायला घाबणार नाही आणि औषध घेण्याची कोणावर वेळ येते, हे ही आगामी काळात कळेल, असा टोलाही खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी लगावला आहे.
देशातील राज्यातील वातावरण भाजपाला प्रतिकूल होत चालले आहे. जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे आणि विरोधक मतभेद विसरून एकत्र येत असल्याने, भाजप नेतृत्वाचा जळफळाट होत असून, अशा भाषणातून तो व्यक्त होत आहे, असेही खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.
जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम तर भाजपाच करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अशा मार्गावरून मार्गक्रमण करीत नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करीत आहे, असेदेखील खा. चव्हाण म्हणाल्या.