पुणे – राज्यातील ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गावांच्या विकासासाठी योगदान द्यावे. तसेच या गावांमधील तरुणांना प्रशिक्षित करुन तज्ज्ञ बनवावे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (पश्चिम विभाग), राज्याचा तंत्र शिक्षण विभाग आणि व्हीआयटी कॉलेज यांच्या वतीने बिबवेवाडी येथील व्हिआयटी कॉलेजच्या सभागृहात संसद आदर्श ग्राम योजना व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या तंत्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन श्री.तावडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयसीटीई चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे होते. एआयसीटीई चे विभागीय संचालक डॉ. अमित दत्ता, संचालक डॉ.अभय वाघ, एनएसएसचे राज्याचे समन्वयक अतुल साळूंखे, डॉ.आर.एस. राठोड, व्हिआयटीचे अध्यक्ष राजकुमार अगरवाल, डॉ. राजेश जालनेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तंत्र शिक्षण विभागाच्या नवीन वेबसाईटचे व माहिती पुस्तिकेचे अनावरण श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तावडे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या योजना गावांतील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे. डीबीटी (थेट बँक खात्यात रक्कम जमा) योजनेमुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे. अशा शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांनी मानसिकता बदलणेही आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दत्तक दिलेल्या गावाबरोबरच अन्य गावेही दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले.
डॉ.सहस्त्रबुध्दे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांचा रोजगारासाठी शहरात येणारा लोंढा कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यादृष्टीने संसद आदर्श ग्राम योजना व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रयत्न केले जात आहेत. तरुणांना लघु उद्योग सुरु करुन स्वत:ची प्रगती साधण्यामध्ये या योजना महत्वपूर्ण ठरतील.
यावेळी डॉ. अमित दत्ता, डॉ.अभय वाघ, डॉ.आर.एस.राठोड, श्री. अगरवाल, अतुल साळुंखे यांची समयोचित भाषणे झाली. आभार व्हीआयटी संस्थेचे अधिष्ठाता (प्रशासन) मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.