पुणे –
उद्योजकांना आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि बेरोजगारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळावा हे एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपसंचालक शरद अंगणे यांनी केले.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे सहसचिव सुरेश शिंदे, प्राचार्य पी.बी. माने, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
खाजगी क्षेत्रातील रोजगार विषयक असणा-या संधीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असल्याने खाजगी क्षेत्राकडे असणा-या नोक-यांचे प्रमाण जास्त आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नोक-यांचे प्रमाण वाढलेले आहे. मार्केटींग क्षेत्रात सुध्दा अनेक संधी उपलब्ध आहेत. विभागीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना आवश्यक ते मनुष्यबळ आणि बेरोजगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेल, असा विश्वास अंगणे यांनी व्यक्त केला.
सोसायटीचे सहसचिव सुरेश शिंदे यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य पी.बी. माने यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक अनुपमा पवार, कानीटकर तसेच इतर अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील होते.