पुणे :
डॉ. अरुण अडसूळ यांचे मत : नॅनो टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमन वेल्फेअर आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ
विज्ञान हे मानवी संस्कृतीमध्ये १२ व्या शतकात विकसित झाले. कल्पना आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या जिज्ञासेमुळे वैज्ञानिक क्षेत्रात विकास झाला. भविष्यातील संशोधनाचे महत्व लक्षात घेत विद्यार्थ्यांमधील ज्ञानाबद्दलची विश्वासार्हता वाढवित संशोधनाचे स्वारस्य निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मकवृत्ती जोपासण्याची जबाबदारी ही शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची देखील आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.
पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमन वेल्फेअर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी हरियाणाच्या नॅशनल स्पेस सोसायटीचे पद्मभूषण डॉ.सुरेश नाईक, पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष किरीटभाई शाह, सचिव हेमंतभाई मणियार, विश्वस्त हरिभाई शाह, सी.टी.बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते, देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. पानसरे, फगर््युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.वसंत वाघ, उपप्राचार्य डॉ. यश मिठारे, डॉ. प्रकाश पंदारे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. गुलाब गुगळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.गिरीश पठाडे यांनी परिषदेचा आढावा घेत सामान्य माणसाला उपयोगी पडेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी साधने नॅनो टेक्नॉलॉजीच्या संशोधनाने तयार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना व संशोधकांना केले. प्रा.नेहा व्होरा यांनी सूत्रसंचलन केले व डॉ.सागर जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता प्रा.अपर्णा पठाडे यांच्या पसायदानाने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. विकास मुळीक, प्रा. अल्मास शेख, डॉ. प्रगती अभ्यंकर व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष प्रयत्न केले.