पुणे
आर्थिक वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात परिमंडलातील वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध विशेष धडक मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही ही मोहीम सुरु राहणार असून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या पथकांसह या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
दरम्यान गुरुवारी (दि. 29) व शुक्रवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकीचा भरणा करता यावा यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.
यंदाच्या आर्थिक वर्षाचा हा शेवटचा आठवडा असल्याने थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेली धडक मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. वरिष्ठ अभियंत्यांसह अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या पथकांद्वारे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा हे पथक वीजपुरवठा खंडित करीत आहेत.
थकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्यक असून त्यानंतरच संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 50 रुपये तर थ्री फेज कनेक्शनसाठी 100 रुपये तर उच्चदाब वीजग्राहकांसाठी 500 रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क कार्यालयीन वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 29 व 30 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली ही मोहीम यापुढेही सुरु राहील. त्यामुळे थकबाकीदारांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र तसेच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.