पुणे – व्यंगचित्र क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यंगचित्रकार तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सरग यांना देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता पुरस्कार आणि दिवाळी अंकांच्या संपादकांचा ‘दिवा पुरस्कार’ गेल्या वर्षी प्राप्त झाला. तसेच 2017 मध्ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्ये त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे प्रकाशित झाली. याची दखल घेऊन ठाण्यामध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनात हा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यंगचित्रकार महेंद्र भावसार, ठाणे महापालिकेचे परिवहन समितीचे राजेश मोरे, कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे आदी उपस्थित होते. राजेंद्र सरग यांचे रवींद्र बाळापुरे, अरविंद गाडेकर, चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, गणेश जोशी, बाबू गंजेवार, विश्वास सूर्यवंशी आदी व्यंगचित्रकारांनी अभिनंदन केले.