पुणे – माघ चतुर्थीला पाळणा हलला… शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला ग सखे… गणेश जन्मला… असा पाळणा म्हणत तब्बल २५१ महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. ओम् गं गणपतये नम: च्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठया थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभा-यात केलेली सजावट डोळ्यात साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरीता प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. शुभांगी भालेराव यांनी गणेशजन्म सोहळ्याचे पौरोहित्य केले. अभिजीत बहिरट यांनी सपत्नीक गणेशजन्माची पूजा केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तांनी ५५१ किलोचा मोदक बाप्पाचरणी अर्पण केला. गणेशजन्म सोहळ्यानंतर सव्वा लाख तिळाच्या लाडूचे प्रसाद वाटप मंदिरामध्ये करण्यात आले.
रविवारी पहाटे ४ वाजता सुप्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तीगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये अनेकांनी सहकुटुंब सहभाग घेतला. दुपारी गणेशाची मंगलआरती देखील करण्यात आली.
सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून वाजत गाजत नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून – लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर – रामेश्वर चौक – टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – अप्पा बळवंत चौक या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. तर रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली. पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.