पुणे –
– भाजपा सरकारचा पिंपरी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून निषेध
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनास विदर्भ-मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे; म्हणूनच या सरकारने धनंजय मुंडे विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी पैसे मागत असल्याची खोटी ध्वनीफित व्हायरल करून कारवाईचा बडगा उगारला आहे, असा आरोप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला.
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 6 मार्च) पिंपरी (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे आनंदा यादव, गंगा धेंडे, रुपाली गायकवाड, संतोष वाघेरे, मयुर वाकडकर, सचिन मोरे, मंगेश बगबळकर, प्रतीक साळुंखे, आशिष निकाळजे, सारथी गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
वैशाली काळभोर म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची क्लिप व्हायरल झाली आहे, त्याची सत्यता पडताळण्याची आवश्यकता आहे. चौकशी न करताच कारवाई करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. सरकारला जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाही. सरकार विरोधात नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी विरोधांना लक्ष्य करीत आहे, असा आरोप काळभोर यांनी केला.
नाना काटे म्हणाले, विधीमंडळ सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न धनंजय मुंडे हिरीरिने मांडत असतात. त्यांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. सर्वसामान्यांच्या नेत्याचा आवाज दाबण्यासाठीच मुंडे यांची खोटी क्लिप व्हायरल केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने हे आंदोलन केले आहे. भाजपा सरकारच्या तीन-साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. उलट भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादीने सामान्य नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न सरकार समोर आणण्यासाठीच हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. खोटे आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करणा-या सरकारला जनता चांगला धडा शिकवेल, असे काटे म्हणाले. यावेळी विजय लोखंडे, आनंदा यादव आदींनी निषेधाचे भाषण केले.