पुणे – सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये तिस-या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे शनिवार, दिनांक ३ व रविवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०१८ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव जाधवर उपस्थित होते. संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून राज्याचे कृषीपणन मंत्री सदाभाऊ खोत हे संसदेचे अध्यक्ष असणार आहेत. तर पोपटराव पवार, राहुल कराड, मंदार फणसे, सुरेशदादा पाटील हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. महाराष्ट्र व गोवा येथून सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी होणार आहेत. तर पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत.
डॉ.सुधाकरराव जाधवर म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. वयवर्षे १८ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थ्यांची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
देशभरातील विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता (०२०) ६५२२७२२७ किंवा ८६०५७६९९७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dr.sudhakarraojadhavartr ust@gmail.com या ईमेल वर स्वत:चे नाव, महाविद्यालयाचे नाव, पत्ता आदी माहिती पाठवावी. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले केले.