MAH: सहा तासांच्या शिफ्टने जीडीपी आणि जीडीएच वाढेल अनिल बोकील यांचे प्रतिपादन; भारतीय छात्र संसदेच्या चौथ्या सत्रात

January 22nd, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

 
 
पुणे – शासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या शिफ़्ट आठ तासांऐवजी सहा तासाच्या कराव्यात. जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल. बेरोजगार युवकांना काम मिळेल. त्यातून सृजशीलता आणि संशोधन प्रकिया वाढेल. कुटुंबियांना वेळ देता येईल. असे झाले तर समाधानी आयुष्य जगता येईल. या सहा तासांच्या शिफ्टमुळे देशाचा जीडीपी आणि जीडीएच दोन्ही झपाट्याने वाढेल, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी केले.
 
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू परिसरात आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या ‘सकल अंतर्गत उत्पादन (जीडीपी) विरूध्द सकल अंतर्गत समाधान (जीडीएच)’ या विषयावरील चौथ्या सत्रात ते बोलत होते.
 
 याप्रसंगी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी विक्रमजितसिंग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रा. एस. परशुरामन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, आयएमसी चेम्बर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राज नायर, अमेरिकेतील ग्लोबल पीस इनिशिएटिव्हच्या राजयोगिनी डॉ. बिनी सरीन, केरळ विधानसभेचे अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन, आचार्य पुंडरीक गोस्वामी, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. के. भट, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक आणि मुख्य निमंत्रक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, विद्यार्थी प्रतिनिधी तारिणी वेंकटनारायण, शशांक सरदेसाई, नेदरलँड येथील मिर्ती वन दे लाऊ, मिहिर नाडगौडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी उत्तराखंड येथील भाजपचे आमदार विनोद खंडारी यांना ’आदर्श युवा विधायक पुरस्कार’, तर वृंदावन मथुरा येथील गौरव कृष्ण गोस्वामी, मुंबईतील गौरगोपाल दास, उत्तरप्रदेशातील मुस्लिम विचारवंत अली अब्बास खान यांना ’युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अनिल बोकील म्हणाले, देशाचा जीडीपी वाढवणे अवघड गोष्ट नाही. व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते साध्य करता येईल. समाधानी आयुष्याचा आलेख मात्र वाढवणे कठीण आहे. त्यासाठी मूल्यांची शिकवण गरजेची आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भौतिक गोष्टी झपाट्याने सुधारत आहेत. परंतु, दुसर्‍या बाजूने आपण  जीवनातील आनंद तेवढा हरवून बसलो आहोत. भारतीय संस्कृती अध्यात्मावर आधारलेली आहे. हेच अध्यात्म जगाला मार्गदर्शक ठरू शकते. युवकांची कामगिरी आणि अनुभवींचे मार्गदर्शन एकत्र आले, तर आपण चीनलाही मागे टाकू. आज खासगी क्षेत्रातील नोकरी करणारांचे आयुष्य प्रचंड तणावाखाली आहे. कुटुंबियांना वेळ देता न आल्यामुळे ते आतल्या आत झुरत आहेत. अतिरिक्त ताणामुळे गुणवत्तापूर्ण काम देण्यातही अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे आठ तासांची शिफ़्ट सहा तासांवर आणली पाहिजे. त्यातून तणावमुक्त काम करण्याची प्रेरणा युवकांना मिळेल.
 
राजयोगिनी डॉ. बिनी सरीन म्हणाल्या, दिवसाची सुरुवात आनंदाने करा. आपल्याबद्दल, मित्रांबद्दल सकारात्मक विचार करा. नकारात्मकता आपल्यातून ’डिलीट’ केली पाहिजे. आनंदी राहण्यासाठी कामाकडे लक्ष देणे, कृतज्ञतापूर्वक वागणे आणि परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती असणे या गोष्टी आत्मसात कराव्यात. चेहर्‍यावर आपोआप येणार्‍या हास्यातून आनंदी जीवनाचा मार्ग सापडतो. ध्यान-धारणा, योग्य आहार-व्यायाम हा सुद्धा आनंदी जीवनाचा मार्ग आहे.
 
विक्रमजितसिंग म्हणाले, हॉटेलमधील चमचमीत जेवण आणि आईच्या हाताचे प्रेममय जेवण असे स्वरूप जीडीपी आणि जीडीएचचे आहे. आर्थिक मोजमापापेक्षा आनंदाचे मोजमाप अधिक प्राधान्याचे आहे. जीवनात आनंद, समाधान आले, तर आपोआप आर्थिक स्तर उंचावतो. जीडीपी आणि जीडीएच हे परस्परपूरक असावेत, असे नाही. चीनमध्ये गेल्या काही वर्षात त्यांचा जीडीपी चार पटीने वाढला आहे. मात्र, आनंदी जीवनाचा आलेख मात्र आहे तसाच आहे.
राज नायर म्हणाले, तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आपण आपापसातील संवाद हरवून बसलो आहोत. कृत्रिम जगात वावरत आहोत. एकाकीपणा येऊन नकारात्मकतेकडे झुकत आहोत. आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना मानसिकदृष्ट्या आपण आपले आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे पैसे कामविण्यापेक्षा आनंद मिळवण्यावर आपण भर दिला पाहिजे. 
 
गौरगोपाल दास म्हणाले, भारतीय संस्कृती महान आहे. त्याला अध्यात्माची जोड आहे. भारतीयांकडे स्मार्टनेस, सेव्हिंग आणि स्पेंडिंग या गोष्टी आहेत. पण त्याला अध्यात्माची जोड नसेल, तर आपण समाधानी आयुष्य जगू शकणार नाही. 
 
श्रीकांत भारतीय म्हणाले, विकासाबरोबरच विश्‍वासाची चर्चा होणे गरजेचे आहे. आज राजकारण जाता-पात, पैसा, भ्रष्टाचार आणि पेचप्रसंग यावर सुरू आहे. या परिस्थितीत बदल आणण्यासाठी कार्यक्षमता, चारित्र्य, विश्‍वसनीयता आणि निश्‍चय यांच्या आधारे जीवनात आनंद मिळवू शकतो.
श्री.पी. श्रीरामकृष्णन म्हणाले, कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेता  आपण  पाश्‍चात्य आणि  पौर्वात्य संस्कृतीचा सुवर्णमध्य साधला पाहिजे. भौतिक सुख आणि आंतरिक समाधान या दोन्हीं गोष्टींची मानवाला गरज आहे. प्राचीन काळी भारतात ही अवस्था होती म्हणून तेथे सोन्याचा धूर निघत होत
डॉ. आय.के. भट यांनी चर्चासत्राच्या विषयाचे प्रास्ताविक केले. विनोद खंडारी, गौरव कृष्ण गोस्वामी, अली अब्बास खान यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. तारिणी वेंकटनारायण, शशांक सरदेसाई, नेदरलँड येथील मिर्ती वन दे लाऊ, मिहीर नाडगौडा या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. प्रा. गौतम बापट, नीलम शर्मा यांनी सूत्रसंचलन केले.
 
Attachments area
 
 
 
 
 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions