– जय मल्हार थिएटर : डॉ. सुरेश वाडकर यांच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन
पुणे – गाणी गाताना कशाप्रकारे रियाज करावा, गाण्यातील शब्दांचे उच्चार कशापध्दतीने करावे, तालाचा अभ्यास कसा करावा, पाशर््वगायनाच्या दृष्टीने कशाप्रकारे मेहनत घेतली पाहिजे, माईक समोर कशाप्रकारे गायन केले जाते. असे गायनासाठी आवश्यक महत्वपूर्ण गोष्टींचा,अनुभवांचा खजिना गायक डॉ. सुरेश वाडकर यांनी स्वरनादानुभाव कार्यशाळेतून उपस्थितांसमोर उलगडला.
गायिका शुभांगी मुळे यांच्या जय मल्हार थिएटरतर्फे एरंडवणा येथील सेवासदन येथे स्वरनादानुभाव या गायक डॉ. सुरेश वाडकर यांच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मुळे उपस्थित होते. अनन्या वाडकर व सौरभ वखारे यांनी सहगायन केले. मोहन पारसनीस (तबला) यांनी साथसंगत केली. डॉ. सुरेश वाडकर यांनी संगीत क्षेत्राला उपयुक्त अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे तंत्र उपस्थितांना सांगितले.
डॉ. सुरेश वाडकर म्हणाले, कोणत्याही प्रकारचे गाणे शिकताना गायनाची सुरुवात ज्या स्वरापासून होते, तो सा हा स्वर व्यवस्थित लावणे गरजेचे आहे. एकदा सा म्हटल्यानंतर पुढच्यावेळी सा गाताना तो आधीपेक्षा लांब कसा म्हणता येईल हे पाहिले पाहिजे. गायनाचा रियाज करताना आपले मन आणि आजूबाजूचे वातावरण आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मन एकाग्र करून चित्त विचलित होऊ न देता रियाज करावा. गाणे गाताना त्याचा अर्थ समजून मनापासून गायले पाहिजे. आपल्याला गाण्याचा भाव समजला तर आपण सादर करताना समोरच्या व्यक्तीला देखील आपल्या गाण्यातील भाव समजेल.
शुभांगी मुळे म्हणाल्या, जय मल्हार थिएटरच्या वतीने अनेक वर्षांपासून विविध संगीतकारांच्या व गायकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी अशोक पत्की, कौशल इनामदार, आनंद भाटे या दिग्गजांच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. संगीत कलेची साधना, जोपासना कशी करावी, कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा, यामधून निर्मळ आनंद कसा घ्यावा, साधनेचे सातत्य कसे टिकवावे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास कार्यशाळेच्या निमित्ताने केला जातो. त्यामुळे संगीत शिकणा-यांना संगीत कलेविषयी उपयुक्त माहिती मिळावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.