पुणे –
कसदार गायकी आणि आलाप-तानांमधील अप्रतिम फिरत दर्शवित प्रख्यात गायिका आशा खाडिलकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वरोत्सव कार्यक्रमातून शास्त्रीय संगीत व भक्तीगीतांमधील नाविन्यपूर्ण रचनांमध्ये रमलेली स्वरमयी सायंकाळ रसिकांनी अनुभवली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वरोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात आशा खाडिलकर यांनी लिहिलेल्या चंपाकली रागातील लागी लगन… मै तो आयी तोरे द्वार… या दोन बंदिशींनी झाली. यानंतर काफी रागातील खेलन आये होरी… या होरी संगीतप्रकारातील बंदिशीने रसिकांची मने जिंकली. राजेंद्र अत्रे यांची रचना असलेल्या आणि आशा खाडिलकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रुणु झुणु झुणु करीत नाद ये गजानना… या भक्तीगीताने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. आशा खाडिलकर यांनी ही रचना प्रथमच या कार्यक्रमात सादर केली.
बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि माणिक वर्मा यांनी गायलेल्या अमृताहूनी गोड नाम तुझे देवा… आणि संत चोखामेळा यांनी रचलेल्या आम्हा नकळे ज्ञान… या अभंगांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. आदित्य ओक (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), नंदू भांडवलकर, प्रसाद भांडवलकर (पखवाज), वेदा नेरुरकर व मधुरा गुर्जर यांनी सहगायन केले. दिपाली केळकर यांनी निवेदन केले.