टिम “येवा कोकणात”
कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे. निवडणुकांच्या अल्याड-पल्याड आलेली ही जत्रा कधी मतदार मिळवून देणारी घाऊक व्होट बँक असते तर काहींना कार्यकर्त्यांचा नेता बनवणारी वाटते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी काही हजारोंच्या संख्येत भरणाऱ्या या जत्रेला लाखो भाविकांची गर्दी जमू लागली आहे. या वर्षी २७ जानेवारीला हि जत्रा होत आहे.
कोकणातल्या जत्रांमागे श्रद्धेची किनार आणि अंधश्रद्धांची जळमटंही चिकटलेली आहेत. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात चार पैसे खुळखुळू लागलेले हवशे-नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात. श्रद्धा आणि नावीन्यतेच्या या जत्रेला गेल्या काही वर्षांत ‘ग्लॅमर’ मिळालं ते मात्र राजकारण्यांमुळे.
आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते. मुंबई हा कोकणचा श्वास आहे. त्याला एकमेकांपासून वेगळं काढता येणार नाही. इतके घट्ट अनुबंध मालवणी माणसाचे मुंबईशी जुळले आहेत. गिरणीतली नोकरी होती तेव्हा आणि आता त्याच गिरणीबाबूंची मुलं कॉपोर्रेट क्षेत्रात नोकरी करत असतानाही कोकणच्या लाल मातीची ओढ त्या मुलांनाही स्वस्थ बसू देत नाही. हे कोकणप्रेम राजकारण्यांनी चांगलंच हेरून त्याचा वेळोवेळी राजकीय फायदा उठवला आहे.
आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने हे कनेक्शन जपण्याचा प्रयत्न आता सगळेच राजकीय पक्ष करतात. निवडणुकीच्या मोसमात नेते आपल्या उमेदवारांना घेऊन आंगणेवाडीला जातात. त्या निमित्ताने नवस वगैरे बोलले जातात. आणि त्याचबरोबर प्रचारही साधला जातो. कोकणातल्या गावागावात ‘अमको उमेदवार मुंबैसून भराडी देवीच्या दर्शनाक इलो,’ असे मेसेज पोचतात. तेच ‘मेसेज’ पुढे मुंबईत ‘फॉरवर्ड’ होतात. अशा फॉरवर्ड मेसेजमधून अनेक कार्यकर्त्यांचे नेते झालेले मुंबई, पुणे, ठाणे आणि अगदी विरारपर्यंत दिसून येतात. जत्रेतून धार्मिकतेबरोबरच राजकीय हेतू जपण्याचं आंगणेवाडी हे कदाचित महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण ठरावं.
आंगणेवाडी जत्रेची तारीख कुठल्या पंचांगात वा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.
महाराष्ट्रात आजघडीला असलेल्या जत्रेमध्ये या जत्रेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे तिथे… प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख… जशी तारीख जवळ येते, तसा सुरू होतो तो खरा जल्लोष… आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात येतो. केवळ ग्रामस्थांचीच नाही तर, प्रशासनाची, एसटी महामंडळाची, सार्वजनिक बांधकाम खात्याची सर्वांचीच प्रचंड घाईगर्दी सुरू असते. कामाला तास कमी पडत असतात. नियोजन आणि मनुष्यसाठा जबरदस्त असतो. पण जत्रेत कसलीच कमतरता राहू नये यासाठी अधिकार्यांच्या मनातला आईचा भक्त सारखा धडपडत असतो. कधी विचार केलाय की जत्रेसाठी तीन दिवस राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याना, बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्याना, पोलीस कर्मचाऱ्याना आणि यासारखे अनेकजण जे ड्युटीवर असतात त्यांना वाटत नसेल का, आपणही सुट्टी टाकून फॅमिलीसह जावं जत्रेला… पण नाही, इथेही जिंकतो त्या प्रत्येकाच्या मनातला भक्त. कारण जत्रेला येणाऱ्या भक्ताची सेवा करणं हीच खरी आई भराडीची सेवा.
जमाना फेसबुक आणि व्हॉटस्अपचा आहे. म्हणजे एकाने टाकलेली पोस्ट दुसर्याने लाइक किंवा शेअर करून हजारो जणांना कनेक्ट करावं असा फास्ट पिढीचा सुपरफास्ट जमाना आहे. कोकणातील सोशल कनेक्टिव्हिटीचं शक्तिपीठ मानल्या जाणार्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची वार्षिक जत्रा थाटात संपन्न होते. महाराष्ट्रभरातून लाखोंची गर्दी आणि करोडोंची उलाढाल असं वार्षिक गणित असणार्या या जत्रेला आता महायात्रेचं स्वरूप आलं आहे.
आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील भराडी देवीची वार्षिक जत्रा आता मुंबई-पुण्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील मालवणी माणसासाठी न चुकवता येण्यासारखी स्थिती बनली आहे. आंगणेवाडी जत्रेच्या तारखेकडे मुंबईकर डोळे लावून बसलेले असतात. तारीख जाहीर झाली की सुट्टी टाकण्यापासून खाजगी गाडी ठरवण्यापर्यंत आणि रेल्वेच्या तिकीट रांगेत सकाळीच जाऊन उभं राहण्यापर्यंतची धावपळ केली जाते. इंडिकापासून लक्झरी बसपर्यंत संख्येनुसार भाविकांचा जथ्था मालवणच्या दिशेने रवाना होतो. भराडीच्या जत्रेत एकजीव होतात आणि पुन्हा आपल्या रहाटगाड्यात परततात. जत्रेची तारीख जाहीर झाली की सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांवर मागे आंगणेवाडी जत्रा अमूक अमूक तारखेला असा फलक लावला जातो. एसटीमध्येही कुणीतरी खडूने जत्रेची तारीख लिहितो. भराडीची महती अशी गावा-गावात, वाडी-वाडीत सर्वदूर पसरते आणि मग चुकला माकला भाविकही शक्तिपीठाशी कनेक्ट होतो!
२०-२५ वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती लाखांची झाली आहे. गेल्यावर्षी १२ लाखाच्या जवळपास भाविकांनी या जत्रेला हजेरी लावली अशी पोलिसांची आकडेवारी सांगते. पूर्वी मंदिरालगत परिसरातच दुकाने थाटली जायची, पण गेल्या काही वर्षात दुकानांची संख्या वाढली आणि परिसरही विस्तारत गेला. त्यामुळेच गर्दीही पांगली. आता मंदिराचेही नुतनीकरण करण्यात आले आहे.
असं असलं तरी कोकणातील या शक्तिपीठाशी असलेल्या कनेक्टिव्हिटीमध्ये काही खंड पडला आहे, नेटवर्क तुटलं आहे, असं घडलं आहे का? बिलकूल नाही. कारण मुंबई-पुण्याच्या चक्रात पिचलेल्या प्रत्येक कोकणी माणसाला जगण्याचं बळ देणारं हे आनंदाचं झाड आहे. कोकणी माणसावर मायेची आणि कृपेची सावली करून फेसबुक आणि ऑनलाइन चॅटिंगच्या युगात वावरणारी ही माणसं आईच्या ओढीने जेव्हा आंगणेवाडीत धाव घेतात, गर्दीत स्वतःला हरवून बसतात ती एका अफाट श्रद्धेपोटीच. ही गर्दी म्हणजे निस्सीम श्रद्धा असणार्यांचा जागरच होय.
मुंबईत आंगणेवाडीची जत्रा ठाऊक नाही, असा माणूसच विरळा! कोकणी माणसाची जत्रा हे या जत्रेचं स्वरूप कालानुरूप पार बदलून गेलंय. निवडणुकांच्या अल्याड-पल्याड आलेली ही जत्रा कधी मतदार मिळवून देणारी घाऊक ‘व्होट बँक’ असते; तर साध्या सश्रद्ध भाविकासाठी अर्ध्यामुर्ध्या स्वप्नांना नवस करून पावणारं हक्काचं ठिकाण, कोकणी माणसाच्या उत्पादनांना ‘मार्केट’ मिळवून देणारी बाजारपेठ; तर कुणासाठी वर्षानुवर्षांचा रिवाज… आंगणेवाडीच्या या जत्रेसाठी मुंबईकर जथ्थ्याने येतात.