पुणे – आयुर्वेद शास्त्र ही भारताची जुनी परंपरा असून आजची जीवनशैली पाहता आयुर्वेद उपचार पध्दीचा वापर वाढला पाहिजे. आयुर्वेद व संयुक्त उपचार पध्दती रुजविण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकांमध्ये त्याबद्दलची विश्वासार्हता निमाण केली पाहिजे. आयुर्वेद शास्त्रामध्ये क्रोनोबायोलाजी सविस्तर पध्दतीने सांगितले आहे. अभ्यासकांनी त्यावर संशोधन करीत हे संशोधन जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत युरोप मधील ग्राझ विद्यापिठातील शरीरविज्ञान शास्त्राचे प्राध्यापक व संशोधक डॉ. मॅक्समिलीयन मोझेर यांनी व्यक्त केले.
सातारा रोड येथील विश्वानंद केंद्रातर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात संयुक्त उपचार पध्दतींसंबंधी मॅक्समिलीयन मोझेर यांनी वैद्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, वैद्यकिय संचालक डॉ. अजित मंडलेचा, संस्थेच्या संशोधन मार्गदर्शिका डॉ. सुप्रिया भालेराव, डॉ. गाऊस मुजावर, डॉ. वैशाली पागे, डॉ. जयश्री जायभाय, डॉ. गिरीष सरडे, कर्नल श्रीराम पेंडसे यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून निरोगी जीवन कसे जगायचे यासाठी सुरू केलेल्या मेडिसिन फ्री लाईफ तसेच स्नायू-संधी विकारांसाठी चालविलेल्या द हलचल या संयुक्त उपचार चिकित्सालयाची माहिती त्यांनी घेतली.
मोझेर म्हणाले, संयुक्त उपचार पध्दती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यावर आणखी संशोधन केले जावे. आयुर्वेदशास्त्रात सविस्तरपणे नमुद केलेल्या क्रोनोबायोलॉजीचे संशोधकांनी संशोधन करून जगासमोर मांडले पाहिजे. तुमची उपचार पध्दती पुढे आणण्यासाठी तुम्ही केलेले संशोधन मेडिकल जर्नलमध्ये प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्याकरीता ग्राझ मेडिकल विद्यापीठ विशेष मदत करू शकेल. तसेच विश्वानंद केंद्रासारख्या संस्थांनी केलेले संशोधन व उपचार पद्धतीला आयुष व ग्राझ विद्यापीठासारख्या संस्थांचा पाठिंबा मिळाल्यास ते जागतिक पातळीवर मांडता येऊ शकते, असे ही त्यांनी सांगितले.