पुणे – “धर्म हा आपला खासगी विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी माणुस या नात्याने समान पातळीवर संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे. एकविसाव्या शतकात चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल, तर जगभर मानवतावाद रुजवला पाहिजे,” असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत पांडव,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, महासचिव डॉ. सुधाकर जाधवर, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. मंगेश तु. कराड, डॉ. जय गोरे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा. दीपक आपटे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा. डॉ. रविकुमार चिटणीस, राज्याचे शिक्षण संचालक धनराज माने, प्रा. शरदचंद्र दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, विश्वशांती केंद्र (आळंदी), युनेस्को अध्यासन आणि असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्याने ही नॅशनल टीचर्स काँग्रेस आयोजित करण्यात आली आहेे.
आयआयटी थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, आयआयटी मुंबईचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, स्मृती चिन्ह व ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
दलाई लामा म्हणाले, “आपापसांतील संवादातून विचारांची देवाण घेवाण होते. समाजात शांतता प्रस्थापित होते. पुरातन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण आहे. आजची शिक्षणपद्धती फक्त तंत्रज्ञानावर आधारित असली, परंतू यामध्ये संवाद फार महत्वाचा आहे. शिक्षण पद्धतीत भावनिक प्रश्नांतून मार्ग कसा काढायचा, याचा समावेश व्हायला हवा. आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, पुरातन शिक्षण आणि भावना यांची सांगड घालण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि शिकण्या-शिकविण्याची प्रथा अधिक चांगली होती. टीचर्स काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षकांच्या दृष्टीकोनाचे आदान प्रदान होईल. त्यातून शिक्षणव्यवस्थेचे सक्षमीकरण तर होईलच; शिवाय, शासनालासुद्धा एक प्रकारची दिशा मिळेल.”
“धर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. परंतु, धार्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील विविध देशांत धार्मिकतेवरुन वाद उद्भवत आहेत. अशावेळी शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. सहिष्णुता, प्रेम याचा प्रसार जनमानसात करायला हवा. पैसा आणि प्रसिद्धी यापलिकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सद्भाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करुन योगदान दिले पाहिजे.”
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले,“ आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगावे धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगिकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाणघेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्रउभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षणपद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे.”
मुक्ता टिळक म्हणाल्या,“देशाच्या विकासाचा आधारस्तंभ तरुण पिढीला घडविणार्या शिक्षकांसाठी हे अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे. प्राथमिक व उच्च शिक्षणात येणार्या विविध अडचणी या व्यासपीठावर मांडता येतील. त्यातून त्या सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरसुद्धा प्रयत्न होतील. टीचर्स काँग्रेसमध्ये मार्गदर्शन करणार्या तज्ज्ञ मान्यवरांकडून नव्या गोष्टी आत्मसात करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद कराव्यात.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ज्ञानदानाचे काम करीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये विचारमंथन घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होऊन भावी पिढी घडविणार्या या शिक्षकांना नवी दिशा मिळेल. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या गुरुजनांचा सन्मान करुन तरुण शिक्षकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”