पुणे – ध्वजाची आकर्षक रंगावली…. भारत माता की जय… जय जवान जय किसान… या घोषणांनी दुमदुमलेला परिसर….आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊचा रहे हमारा… या समूहगीतातून चिमुकल्यांनी ध्वजाला वंदन केले. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात तब्बल ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजासह सशस्त्र सुरक्षा दलाच्या ध्वजाप्रती असलेला आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केला.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी कर्नल सदानंद साळुंखे, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, रवींद्र गायकवाड, राजा महाजन, पराग गोडबोले, चित्रा माळवे, स्वाती मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नागमोडे आदी उपस्थित होते. यावेळी २० बाय ३० आकारातील भव्य रंगावली काढण्यात आली. शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगानातून मानवंदना दिली. अमर लांडे आणि सहका-यांनी रंगावली काढली.
कर्नल सदानंद साळुंखे म्हणाले, आपल्या मनात कायम देशाविषयी प्रेम असले पाहिजे. माणसाने आयुष्यात आई-वडिलांना अभिमान वाटावा असे काम केले पाहिजे. आपल्या चांगल्या वर्तणुकीतून आपल्या शाळेचे नाव देखील मोठे केले पाहिजे. मोठ्यांचा आदर करण्याप्रमाणेच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या, नेहमी हसतमुख रहा हे नियम आयुष्यात मोठे होण्यासाठी उपयोगी पडतील. जवानांची आठवण आजच्या दिवासापुरती मर्यादित न ठेवता ते सदैव तुमच्या मनामध्ये असूद्या, असेही ते म्हणाले.
मोहन जोशी म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी त्याचे पूजन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशाचे रक्षण करण्याचे काम सैनिक करीत असतात. अशा शूरसैनिकांना वंदन करण्यासाठी, त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सप्ताहाचे हे तेरावे वर्ष असून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. चेतन आगरवाल यांनी आभार मानले.