पुणे – ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘पुणे महानगरपालिका’, ‘सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह’, ‘सस्टेनेबल लिव्हींग इनटीग्रीएटेड सोल्यूशन्स’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ आणि ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे
उदघाटन रविवारी सकाळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी सुमन किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले .
’आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिक म्हणून आपलीच आहे . प्रत्येक वेळी सरकार ,पालिका याना स्वच्छतेसाठी जबाबदार धरणे,दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणे योग्य नाही . नागरिकांनी स्वच्छता प्रकल्पात पुढाकार घेतला पाहिजे .कचरा वाढत असल्याने अनेक समस्या वाढत आहेत . ग्रीन सोसायटी स्पर्धा हा उपक्रम उपयुक्त असून त्यातून चांगली जागृती घडून येईल ‘ असे प्रतिपादन सुमन किर्लोस्कर यांनी यावेळी बोलताना केले . ’ पाणी ,कचरा आणि ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणे आवश्यक असून आपले शहर स्वच्छ,सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग हवा ‘ असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात केले.
पाणी कचरा व ऊर्जा यांचे उल्लेखनीय व्यवस्थापन करणाऱ्या गृहसंस्थाया स्पर्धेत भाग घेत आहेत . त्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी यावेळी बोलताना दिली.
गणेश जाधव, रोटरी चे प्रकल्प संचालक जिग्नेश मेहता ,विश्वास लेले, गिरीश मठकर, अनघा पुरोहित, निरंजन उपासनी, मनीषा कोष्टी व मकरंद केळकर, पालिकेचे आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान हे यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाटन सुमन किर्लोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी गांधीभवन येथे सकाळी 10 वाजता झाले. स्पर्धेनंतर निरंजन उपासनी, सुचिस्मिता पै, विश्वास लेले .रोझलँड सोसायटीचे संतोष म्हसकर, अमर चक्रदेव या तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते .
महापौर मुक्ता टिळक यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या, ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्था स्पर्धेची प्रायोजक आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारा कालावधी दिनांक 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत असून, प्रकल्प तपासणी 10 ते 20 फेब्रुवारी 2018 रोजी होईल आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 फेब्रुवारी 2018 रोजी होणार आहे.
