पुणे – शहराचा विकास योग्य पध्दतीने होण्याकरीता पीएमआरडीएने चांगले नियेाजन केलेले आहे. शेतक-यांचे नगररचना योजनेसंदर्भातील असलेले गैरसमज दुर करुन तसेच कोणीही जागेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन, शेतक-यांनी संमती दिल्यानंतरच काम सुरु करण्यात येईल. सर्वांना समान न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित टि. पी. स्कीम कार्यशाळा, हांडे लॉन्स, हांडेवाडी येथे ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी रिंगरोड क्षेत्रात येणा-या निंबाळकरवाडी, येवलेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी- औताडेवाडी, होळकरवाडी या गावातील संबधित जमिनधारकांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, शेतक-यापर्यंत या योजनेसंदर्भात योग्य माहिती पोहोचविली जाईल. प्रत्येक गोष्टीची कल्पना शेतक-यांना देऊनच या कामास सुरुवात केली जाईल. सर्वांच्या फायद्यासाठीच ही योजना असून यामुळे सर्व नागरिकांची सोय होणार आहे. लवकरच या परिसरात पीएमआरडीएचे कार्यालय सुरु करण्यात येईल. ज्यामुळे नागरिकांना नकाशाव्दारे अधिका-यांकडून थेट माहिती मिळू शकेल असेही श्री. बापट म्हणाले.
पाणी, गटारे, वीज तसेच गार्डन, शाळा, दवाखाने, बसस्टँड, पार्कींगची जागा, ओपनस्पेसच्या सर्व सुविधा पीएमआरडीएमार्फत पुरविल्या जातील. या योजनेमार्फत शेतक-यांचा आठपट फायदा होईल. रिंगरोड जवळील शेतक-यांना रिंगरोड लगतच जमिन मिळेल. शेतक-यांना चौकोनी आकाराचे भुखंड देण्यात येईल. प्रत्येक प्लॉटला रस्ता देण्यात येईल अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी दिली.
या कार्यशाळेस पीएमआरडीएचे नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, पंचायत समिती सदस्य जीवन घुले, संबधित गावांचे सरपंच तसेच जमिनधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.