सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक, मच्छिमारांना व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे..कारण जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर हे सातत्याने या व्यवसायिकांवर प्रशासनामार्फत अत्याचार करीत आहेत. आणि परजिल्ह्यातील व्यवसायिकांना अभय देत असल्यानेच येथील वाळू व्यवसायिकांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे. त्यामुळे हे पालकमंत्री गोव्याचे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष आनंद शिरवलकर यांनी केला आहे.
वाळू व्यावसायिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत पालकमंत्री दिपक केसरकर यांना वेळोवेळी भेटून, निवदने देवून काहीच केले नसल्यानेच अखेर या पालकमंत्र्यांनाच काळे झेंडे दाखवून निषेध केला. या आंदोलकांवर जी कायदेशीर कारवाई केली ती पोलिस ठाण्यापर्यतच मर्यादीत होती. मात्र पालकमंत्र्यांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना पोलिस न्यायालयात घेवून गेले. तर काही दिवसांपुर्वी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरूध्द शिक्षकांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर किरकोळ कारवाई केली. पण पालकमंत्री दिपक केसरकर हे सुड भावनेतून कारवाई करीत आहेत. त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा गोव्यातील व्यावसायिकांवर प्रेम आहे. गोव्यातील पकडलेले माशांचे ट्राॅलर सुध्दा काही वेळात सुटले. हे कशासाठी केले जाते. तर कुडाळ येथे वाळूचे डंपर पकडले त्यांच्यावर कारवाई झाली. प्रतिज्ञापत्र, दंड घेतला. मात्र हे डंपर अद्याप सोडलेले नाहीत. हा डंपर व्यावसायिकांवर अन्याय नाही का? येथील वाळू व्यावसायिक, मच्छीमार अन्य व्यवसायिकांना मातीत मिळविण्याचे काम शिवसेनेचे पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे करीत असल्याचा आरोप आनंद शिरवलकर यांनी केला आहे.